पवनानगर (प्रतिनिधी): विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या माकडाच्या पिल्लाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने वाचवल्याची घटना आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिकोनापेठ येथे घडली.
आज दुपारी तिकोनापेठ पवनानगर येथे एका माकडाच्या पिल्लाला विजेचा धक्का लागून ते जखमी झाले . या घटनेची माहिती मिळताच त्वरित त्याची खबर वनविभागास देऊन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे व संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि सदस्य जिगर सोलंकी , गणेश निसाळ यांनी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना संपर्क करून त्यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी गेले . तेथे जाऊन माकडाच्या पिल्लास ताब्यात घेतले.
सदरचे पिल्लू वनविभागाचे वनरक्षक एस . जी . खटके तसेच गफूर शेख मामा , विशाल सुतार यांच्या ताब्यात देण्यात आले . ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक तपासणीमध्ये असे निदर्शनात आले , की हाताच्या पंजाला विजेचा धक्क्यामुळे दुखापत झालेली आहे . प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले . गराडे यांनी सदर रेस्क्यूसाठी कळत नकळत मदत केलेल्या सर्व सदस्यांचे तसेच वनविभागाचे आभार मानले तसेच तुमच्या परिसरात जखमी वन्य प्राणी आढळल्यास कृपया वन विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा . 1926 किंवा कोणत्याही रेस्क्यू टीमसोबत संपर्क साधा , असे आवाहन केले आहे.