लोणावळा : पर्यटकांनो सावधान,, लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आल्यास बेशिस्त वागणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
लोणावळा शहरात पावसाळा आलाकी पर्यटकांची वर्दळ जोमाने सुरु होते. दरम्यान मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा ते कार्ला हद्दीत वाहतूक कोंडीची समस्या कायम असते अशा परिस्थितीत वलवण गाव ते खंडाळा या हद्दीत वाहतूकीचे नियम मोडनाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची बारीक नजर असून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.
लोणावळा शहरात पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात यादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस प्रशासनाकडून शहरातील विविध परिसरात 100 सूचना फलक लावण्यात आले आहेत, तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी वळणाच्या ठिकाणी रस्त्यांवर दिशा दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पर्यटकांच्या सुरक्षे हेतू भुशी डॅमवर लाईफ गार्डची नेमणूक करण्यात आली आहे तर तुंगार्ली डॅम याठिकाणीही लाईफ गार्डची व्यवस्था करणार असल्याचे निरीक्षक डुबल यांनी सांगितले.
मागील दोन वर्ष पावसाळा कोविड च्या निर्बंधांमध्ये गेला असल्यामुळे या वर्षी लोणावळा शहरात पर्यटकांचा वाढता कल लक्षात घेता खंडाळा, भुशी डॅम रोड, कुमार पोलीस चौकी या ठिकाणी पोलीस चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. या चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी केली जाणार असून अंमली पदार्थ, मद्य ( दारू ) सापडल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पर्यटकांनी व स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, पर्यटकांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले आहे.