Saturday, November 23, 2024
Homeपुणेमावळवाकसई ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामस्थ महिलांचा धडक हंडा मोर्चा…

वाकसई ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामस्थ महिलांचा धडक हंडा मोर्चा…

मावळ (प्रतिनिधी):वाकसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकसई, देवघर, करंडोली,जेवरेवाडी येथील पाणी पुरवठा सुरळित करण्याबाबत येथील महिला ग्रामस्थांचा वाकसई ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.या गावांना आठवडयातुन एक दिवस पाणी येते ते ही कमी दाबाने व अनिश्चित वेळेस पाणी पुरवठा होत असुन याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आक्रोश महिलांकडून व्यक्त करण्यात आला आहे.तसेच याठिकाणी बंगले भाड्याने देण्याचा प्रकार जोमाने सुरु असल्यामुळे या बंगले धारकांमुळे सामान्यांना पाणी टंचाई होत असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
वाकसई ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी पाणी प्रश्न मागील अनेक वर्षांपासून सुरुच आहे. सुरुवातीला याठिकाणी एका दिवसाआड, नंतर तेच पाणी तीन दिवसावर पोहचले,थोडे दिवस नागरिकांनी कसे बसे यामध्ये समाधान मानताच हे पाणी तब्बल आठ दिवसांनी येऊ लागले तेही अनिश्चित वेळेस व कमी दाबाने येत आहे.घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरून सुद्धा येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.आता हा पाणी प्रश्न पुन्हा ऐरनिवर आला असल्यामुळे या चार गावातील महिला आक्रमक होऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढण्यात आला आहे.तसेच यावेळी निवेदनामार्फत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
महिला ग्रामस्थांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत :-
1)पाणी पुरवठा हा दिवसाआड योग्य वेळेवर व पुरेश्या प्रमाणात करणेत यावा.
2)पाणी पुरवठा वेळापत्रक व कोणत्या ठिकाणी कोणता कर्मचारी पाणी पुरवठा करणार आहे, यांची माहिती म्हणुन प्रत्येक गावात एक बॅनर लावणेत यावा.
3)पाणी पुरवठा नियोजन समिती तयार करणेत यावी.
4)व्यवसायिक व बंगलेधारकांना पाणी पटटी वाढविण्यात यावी. 5)भाडेकरूंची/बाहेरून आलेल्या नोकरदारांची माहिती ठेवणे.
वरीलप्रमाणे मागण्या हया पुढील 15 दिवसांत पूर्ण न केल्यास सर्व महिला ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page