लोणावळा (प्रतिनिधी):माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतत्त्वाखाली शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी दि.11सप्टेंबर पासून पुणे येथील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथून पायी दिंडीला सूरूवात झाली.
आज सकाळी 11:30 वाजता दिंडी वाकसई येथे पोहचली. संत तुकाराम महाराज झाड पादुका मंदिर येथे देशमुख विद्यालया तर्फे दिंडीचे स्वागत करण्यात आले. सहविचार सभेत रायगडचे आमदार बाळाराम पाटील, अमरावतीचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे शिक्षक कृती समितीचे मवाळ येथिल कार्यकर्ते शंकर धावणे, देशमुख माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी दिंडीत सहभागी झाले होते.
1 नोहेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. 1 नोहेंबर 2005 नंतर अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनाने 1992 पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या आर्थिक अडचणीमुळे नोहेंबर 2005 नंतर 100% अनुदान दिले. यात शिक्षकांचा काय दोष ? शासनाने नोव्हेंबर 2005 आगोदर पासून सेवेत असणाऱ्या 28000 कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजने पासून वंचित ठेवले आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई मंत्रालया पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली आहे.
आमदार बाळाराम पाटील म्हटले शाळांना अनुदान, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली.20% टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले पुढील टप्पा मिळण्यासाठी शाळांचे इन्स्पेक्शन करून त्यातील शाळा टप्पा अनुदानासाठी वगळण्यात येतात. अनुदान पात्र असूनही न देण्याकडे सरकारचा कल आहे. या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील विना अनुदान तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना न्याय मिळावा व टप्प्यासाठी प्रतीक्षा न करता अनुदान मिळावे यासाठी सर्व शिक्षक बांधव दिंडीत मोठया संख्येने सहभागी होत आहेत.
तर माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना शिक्षक हा उच्चशिक्षित वर्ग आहे, तरी देखील वेट बिगारी सारखी वागणूक संबंधित घटकाला दिली जाते. त्रुटी दाखवून अनुदानापासून हा घटक कसा वंचित राहील याचा विचार शासन दरबारी केला जातो. ज्ञानदाना सारखे पवित्र काम करून पगार न मिळणे,पेन्शन योजनेचा लाभ न मिळणे असे अन्यायकारी वागणूक सरकार करीत आहे. त्याच्या विरोधात एल्गार पुकारण्यासाठी आज आम्ही तिघेही आमदार शिक्षकांसोबत पुण्यापासून मुंबईपर्यंत मंत्रालयात पायी जाणार आहोत असे ते म्हणाले.