लोणावळा : मुंबई पुणे महामार्ग असो वा शहरातील रस्ते मोकाट जनावरांचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. लोणावळा शहरातील भांगरवाडी चौक, मावळे चौक ते साधना शॉपिंग सेंटर येथील रस्ता, तसेच मुंबई पुणे महामार्गावरील वलवण ते गवळीवाडा यादरम्यान ही मोकाट जनावरे मोकाट वावरताना दिसत आहेत तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यावर ठिय्या मारल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
मागील महिन्यात नगरपरिषदेच्या एजन्सीजने मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई केली होती. परंतु परिस्थिती अजून तशीच, ह्या मोकाट जनावरांचा वावर मोठया प्रमाणात वाढलेला दिसत आहे. शहरातील मावळा चौक रस्त्यावर जनावरे ठिय्या मांडून बसलेली दिसत आहेत, भांगरवाडी चौक ते रेल्वे गेट रस्त्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी ही मोकाट जनावरे बिन फिकर बसलेली आढळत आहेत. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचाही शहरातील अनेक रस्ते, चौक ठिकाणी मोठया प्रमाणात वावर वाढलेला दिसत आहे.
ह्या मोकाट जनावरांचे शेण विष्टा रस्त्यावरच पडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. आणि त्यामुळे मात्र पायी चालणाऱ्या नागरिकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोणावळा नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या एजन्सीजकडून मोकाट जनावरे, भटकी कुत्री, डुकरे पकडण्याचे काम योग्य प्रकारे होत नाही. नगरपरिषद प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत ह्या मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत.