Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडशिल्पकार साहित्य कला मंडळ - कर्जतचे संस्थापक पी. ए. घोडके यांच्या जयंतीनिमित्त...

शिल्पकार साहित्य कला मंडळ – कर्जतचे संस्थापक पी. ए. घोडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा संघर्षमय जीवनपट…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )मनुष्य ध्येयाने पछाडला की त्याला आपला समाज आपल्या जीवनाचे , कुटुंबाचे अविभाज्य घटक दिसत असतो . सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाचे ऋणी आहोत , समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे , ही तळमळ सतत ज्योती प्रमाणे तेवत ठेवून आपले शरीर त्यागाचे कार्य करून झिजवणारे या समाजात हाताच्या बोटावर आपण पहात असतो.
त्यातीलच एक शिल्परत्न म्हणजे शिल्पकार साहित्य कला मंडळ – कर्जतचे संस्थापक , साहित्यिक , शीघ्र कवी , समाजरत्न पुरस्कृत , समाजसेवक , पी.ए.घोडके उर्फ जीवन घोडके यांच्या संघर्षमय जीवनाचा जीवनपट त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उलगडावासा वाटतो.” काव्य हे आईना आहे , आईना ही काव्य आहे , असे भासते मनाला पण मीच का म्हणावे कविता हे जीवन आहे जीवन हे काव्य आहे , असे भासते मनाला पण मीच का म्हणावे या कविता प्रमाणे सागराच्या देहातून निर्माण होणाऱ्या लहरी त्याप्रमाणे आमचा जन्म एक अशा वैचारिक सागरातून झाला आणि ते सागर म्हणजे सर्वांचे बाबा , आमचे श्रद्धास्थान आमचे गुरुवर्य पांडुरंग अर्जुन घोडके उर्फ जीवन घोडके यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला.
तर ते २४ एप्रिल २०२१ या दिवशी बुद्धवासी झाले .” पांडुरंग अर्जुन घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा प्रवास पाहणारे खूप असतील पण त्यांची ती समाजाप्रती असलेली तळमळ पाहण्याचे सौभाग्य त्यांच्या मुलांना मिळाले , हे त्यांचे भाग्यच . त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे झाला . त्यांच्या कुटुंबात आई – वडील , काका – काकू आणि बहीण असे मोठे कुटुंब परिवार त्या काळात होता.
गरिबी असल्याने शिक्षण घेण्यास अनंत अडचणी येत असे , मात्र त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना घरातून शिकवण्यास सुरुवात केली . परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खूप संकट आली पण अशा परिस्थितीत इयत्ता चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले , पुढे शिकायची ईच्छा होती पण त्यांचे वडील मयत झाले आणि त्यांचे शिक्षण तिथेच थांबले . परंतु न डगमगता त्याही परिस्थितीत आईची व बहिणीची जबाबदारी घेऊन लहान वयात कामे करणे , त्यातूनच वाचनाचा छंद जोपासत छत्रपती शिवाजी महाराज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर – फुले – शाहू – तथागत भगवान बुद्ध – कबीर – संत गाडगे बाबा – स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचून आणि बाबासाहेबांची गीते – भजन – कीर्तन – भक्ती गीते – ऐकून त्यातून वाद्य संगीत यांची आवड निर्माण झाली.
मुळातच वाचनाची आवड , संगीताची आवड त्यांच्या साधारण वयाच्या १६ व्या वर्षी लागताच अनेक कार्यक्रम त्यांनी एक गायन संघ मित्र परिवाराच्या बरोबरीने तयार केला . हरिश्चंद्र सोनावणे , बळीराम सोनावणे , अशोक गवळे , तानाजी गायकवाड , जानू गायकवाड रामचंद्र गवळे हे सगळे मिळून कोणाच्या शेतात , कुणाच्या घरात , तर कोणाच्या भातखळ्यात वाद्य घेऊन ताल धरून गायनाला शिकले . पण वाद्यासाठी कोणताही गुरु नसताना भजनाचा ताल धरून ते पेटी तसेच तबला ढोलकी हे वाजवायला शिकले . त्याही परिस्थितीत शीघ्र कवी म्हणून विठ्ठल उमप , प्रल्हादजी शिंदे , यांच्या बरोबर ते गायनाला बसत होते.बँकेत नोकरीला असूनही समाजाप्रती त्यांचे प्रेम आणि बांधीलकी जपत भारतीय बौद्ध महासभा , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , कॉम . नाना ओव्हाळ यांच्या बरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांत काम करून गावोगावी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार – प्रसार – प्रबोधन केले . कॉम. नाना ओव्हाळ सारख्या मोठ्या विद्वान माणसाचा सहवास त्यांना लाभला . कुठे मोर्चे तर कुठे उपोषणे करून त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
रस्ते , वीज , पाणी , एस टी सेवा , अन्याय , अत्याचार या विरोधात त्यांची उपोषणे बबन गायकवाड , गोपीनाथ ओव्हाळ , गोपाळ शेळके यांच्या सोबतीने चांगलीच गाजली . त्यांच्या सर्व कार्यात सावली सारखी बरोबर असणारी त्यांची पत्नी सुमन व मुले प्रेरणा – अभिनय – अश्विनी – प्रगती व प्रणित यांची साथ नेहमीच होती.
समाजात जाऊन कलाकारांना न्याय देण्यासाठी त्यांनी सन २०१० ला शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन केले , त्यासाठी त्यांनी २०१० ला आपल्या बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला .त्यांचा शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन करण्याचा उद्देश असा होता की जे कलाकार ऐन तरुणपणी कलाकार म्हणून जगतात मात्र वृद्धापकाळात त्यांचे जीवन खूप खडतर होते , त्यांना पेन्शन योजना , किंवा इतर काही मानधन , आधार सुरू करणे , असा त्यांचा मानस होता आणि त्यात ते यशस्वीही झाले . ते एक शीघ्र कवी होते , गायक विजय ढोले , अशोक सोनावणे आणि दिवंगत चंद्रकांत पवार यांचे ते गुरुवर्य होते . अश्या या महान रत्नाचा जीवनपट संघर्षमय होता. पी.ए.घोडके तथा जीवन घोडके या संघर्षमय नायकाच्या – कलाकाराच्या जीवनपटाचा परिनिर्वाण २४ एप्रिल २०२१ म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या शिल्पकार साहित्य कला मंडळ या वर्धापन दिनीच झाला . आज ०१ ऑक्टोबर २०२२ त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली !
- Advertisment -

You cannot copy content of this page