लोणावळा : महाशिवरात्री निमित्त लोणावळा रायवूड पार्क येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेली अनेक वर्षांपासून रायवूड पार्क येथील सिद्धेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री निमित्त भाविक दर्शनासाठी व जत्रेचा आनंद घेण्यासाठी असंख्य प्रमाणात येत असतात परंतु मागील दोन वर्षे ही जत्रा रद्द करण्यात आली होती. त्यावेळी फक्त येथील पुजारी व सिद्धेश्वर देवस्थानचे सदस्य यांच्या उपस्थितीत महाशिवरात्री निमित्त महाअभिषेक घालण्यात येत होता. शासनाचे सर्व निर्बंध हाटल्याने येथील महाशिवरात्रीला पुन्हा जत्रेचे स्वरूप निर्माण झालेले दृश्य सर्वत्र दिसून आले आहे .
यावेळी सिद्धेश्वर देवस्थान लोणावळाच्या वतीने सर्व भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पहाटे 4 वाजता महाअभिषेक करून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी पहाटे पासूनच श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भाविकांची मंदियाळी पहायला मिळाली. अनेक तरुण, महिला व लहान मुले या जत्रेत मोठया संख्येने सहभागी होऊन विविध खेळ वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटत होते तसेच आकाश पाळणा, घसरगुंडी खेळण्यात तरुण व बालक मंडळी व्यस्त होऊन सर्वत्र आनंदमयी वातावरण निर्माण झालेले चित्र दिसून आले.
यंदाची महाशिवरात्री आनंदोत्साहात पार पडावी यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जगदीश निंबाणे, उपाध्यक्ष धीरूभाई टेलर ( कल्ल्याणजी ), खजिनदार गणेश शिवाप्पा गवळी व सदस्य रामलिंग संगोल्ली, गामाण्णा कुंभार, संतोष चोरडिया यांनी विशेष परिश्रम घेतले त्याच बरोबर लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजचे लायन गिरीष पारख व लायन विश्वनाथ पुट्टोल यांच्या विशेष सहकार्याने सर्व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजचे अध्यक्ष लायन सुधीर कदम, सेक्रेटरी लायन रंजना पुट्टोल, ट्रेझरर लायन धिरेंद्र चवकीकर, ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन लायन उदय शेट्टी, लायन पल्लवी शेट्टी व लायन अमीन वाडीवाला यांसमवेत सर्व सदस्य उपस्थित होते.